Sunday, 29 January 2012

काळ, मन आणि वेग


भुतकाळाचा मागोवा घेत
इतिहास खोदत बसणारे
बनुन जातात अश्वत्थामा
नवनिर्मीतीचा आत्मा त्यागुन गेलेलं
जखमी कलेवर......
त्यांचा श्वास अनुबद्ध असतो
आपल्या मारेकरयाशी,
जखम देणारयाशी.

जगता जगता,
अनेकदा आभास होतो.
आणि दिसतात,
भविष्याकडे जाणारया
आपल्याच पावलांच्या
रक्ताळलेल्या पाऊलखुणा
वाटते, सारे काही इथेच संपावे
असेच वर्तमानात.
निसटुन जावे सगळे स्वतःचे..
वाहुन जावे सारे जमवलेले..
स्वतःसकट नी स्वतःशिवाय!

भीतीची अनोळखी स्पंदनं
शांत पावलांनी येतात
जीवनाच्या, भावनांच्या
पुंजांमध्ये शोधत रहातात,
निषिद्ध अंधार.....

मात्र आम्ही वर्तमानात
जगतो?!
नव्हे केवळ  असतो.
वर्तमानात असते ती
केवळ भूक!
शाश्वत आणि चिरंतन! 
                            (yet to complete this poem.)

Tuesday, 24 January 2012

दोन प्रयास

शरीराची वावटळ काही मिन्टांची
मनाची वादळं काही अंशाची !
उत्तर चुकेल,
तिढा हुकेल,
प्रकाशाचा पदर ढळेल!

दुःखाची फुले वेचुन घेऊ
नी सुखाचं निर्माल्य होऊ
ये, पुर्णांशाने नग्न होऊ
नी पहाडावरुन जीव देऊ

Sunday, 15 January 2012

ते सर्व

बांधावरती उभे रहातात  एकमेकांना खेटुन
ते सर्व!
त्यांचं त्यांनाच कळत नाही
हळुहळु ते स्वतःच होऊन जातात बांध.
मनातला किंवा  मनाबाहेरचा अंधार
थोपवत रहातात, उद्याच्या आशेने
पण एकमेकांना खेटुन,डोळे गच्च मिटुन
आणि लाटेकडे पाठ फिरवुन
प्रश्न सुटत नसतात.
मग अंधारपोकळीचं अवकाश होतं.
शरिरं भरडतात,
मनं उध्वस्त होतात.
रक्त, हिंसा आणि आरोळ्यानी
सारं काही भरलेलं असताना,
अन्यायी राजा नी शुर प्रजा
गोष्टीमधुन फक्त हसतात.

दंगलीत मेलेल्या कुणाचं तरी शव
असंच पडुन रहातं मार्गात.
कोल्हेकुत्रांच्या भयासकट
नगर ध्वस्त होत रहातात.
त्या सर्वांसकट नी जिवंत प्रेतांशिवाय!
मग ते सारे जमतात सुद्न्यपणे
काही झालंच नाही अशा मनाने.
वाळवी उखडुन टाकली जाते,
अंधार लिहीला जातो,
मिटवला जातो
प्रश्नांसकट
व्रणांसकट
पण नुसतं लिहुन अंधार संपतच नाही
अंधार संपण्यासाठी नसतोच मुळी
बांध मात्र तुटण्यासाठी बनवले जातायत
शतकानुशतकें.....
नियती

गर्दीत लहान मुलासारखं
शरिर हरवुन बसतं कधीतरी
सैरभैर, प्रश्नांकित
आणि मनाला आपण हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....

पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत मूकपणे
चालत रहाते.

तिच्यात सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात

भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
शवपेटीत बंद.

चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा