Saturday 19 November 2011

पाऊसगाणी

सूर्य बुडे पायथ्याशी
रंग ओंजळ भरुन
गाव जाता अंधारुनी
येतो सावल्या घेऊन

एका अंगणी पावसाची
होती धून घनधुंद
कुण्या बाहुलीचा होता
वेड्या सुखाचा प्रपंच

त्याने पापांच्या पायाने
तिचे उष्टावले फूल
उंबर्‍यात अनाथ झाले
भोळ्या तुळशीचे मूळ

धुक्यात हरवले घर
पात्रात अडकली नाव
लाज सावराया आला
उभा आंधळाच गाव

उभा काठावर जीव
येई डोहातुनी हाक
एका ईवल्या डोळ्यांची
हले पापणीही मूक

रडुनिया निजे पाखरु
भ्रमित उत्तरांची मिठी
ती शरिर घेऊनी येता
निघे फकिर भरल्या पोटी

दुःख कोवळे पुरताना
ती सोडुन देते वेणी
का स्पर्श कुणाचे येतील
घेऊन भरली पाऊसगाणी?

Monday 14 November 2011

मागधी

ऎकलंस का मागधी?
जुन्या शहराची गाठ सोडुन आलोय
या शहरात
मृत्युची भेट घ्यायला
जिवाची शांत अखेर
सत्याच्या अलिकडची?
की मनाची करुणार्त धडपड,
सत्याच्या पलिकडची?

जुन्या शहरातुन तोडुन
आलोय जुने बंध
पण घेऊन आलोय दंतकथा...
प्रकाशाच्या पुर्वजांनी
सांगितलेल्या

ऎकलंस का मागधी,
ते शहर सोडताना
मी कन्फेशन्स ऎकुन
आलो एका देवदुताची.
इथे मी सुद्धा
झालोय देवदुत
शोकासाठी....
पण यासाठी मी काय उधळलंय
माहितीये का मागधी?
माझी अंतरिम प्रतिभा.....

विक्रीदर

पुढच्या रस्त्याला
लागलं कि दिसतं,
वाकड्या वळणावर
नजाकतीने जळतयं,
एक दगडी शांत शरीर...

मांसाच्या धुराचे सावळे ढग
हरवुन जाता आहेत
दिगंतात

मरणारा कवी होता
त्याची वेदना अनौरस होऊ नये
म्हणुन त्यांनी
एक छोटासा ढग
बंदिस्त करुन ठेवला
कुपीत.

आणि उरलेल्या राखेजवळ
त्यांनी सुरु केला
आठवडी बाजार

Wednesday 9 November 2011

द्विदल बांधणी

हेलो हेलो
कॅन यु हिअर मी?
माझ्यात असलेला मी
शोधु पहातो काहितरी

येस डार्लिंग,
टॉक टू मी.
पलिकडुन उत्तरतो
माझ्यात नसलेला मी

स्वतःच्या वेगळेपणाचे भान असलेले
हे विचित्र दोघे
एकमेकांना निरुत्तर करित रहातात
रात्रभर!

Tuesday 8 November 2011

फिसीकल रात्र

अजाणतेपणी तुझा देह खुडुन
निघुन गेलेल्या फिरस्त्याची
आठवण तुझ्यावर गोंदलेली असते,
’पेन ऑफ दि ख्रिसमस पास्ट’!
करुणाग्रस्त आणि अतृप्त मळवट

उत्कट डोळ्यांनी आतुर
असतात माझी वखवखलेली रंध्र
जमेल तितका प्राशुन घेण्यासाठी
तु़झ्या वेदनेचा फिसीकल फॉर्म

पुरलेल्या सगळ्या वेदना
उकरुन काढल्या तरी
एक रात्र पुरत नाही
गतकाळाचे आंधळे संदर्भ
ओरबाडुन गलबलायला.

तुझ्या माझ्यातली
दोन अजाण समदुःखी मुलं
अनुभुतीच्या असंबद्ध लयीने
ग्रासुन जातात,
या समागमाचे उगम शोधताना.

गुंफलेली कोवळी वीण
तु सहज ओलांडुन जातेस
माझा शापित यक्ष,
मागे ठेऊन ओंजळभर
सावल्यांचे चित्रविचित्र तुकडे

जातं आयुष्य कोंदट होऊन
नि:शब्द शुष्क निश्वासांनी
अशातच दिशाहिन झालेल्या
स्मृतींची लक्तरें विचारतात

अनैतिक करुणा घेऊन उशाशी
त्वचा श्रुंगारुन घरंगळत
हे शरिर जातं रात्रीजवळ
की रात्र येते शरिराजवळ?