Saturday 19 November 2011

पाऊसगाणी

सूर्य बुडे पायथ्याशी
रंग ओंजळ भरुन
गाव जाता अंधारुनी
येतो सावल्या घेऊन

एका अंगणी पावसाची
होती धून घनधुंद
कुण्या बाहुलीचा होता
वेड्या सुखाचा प्रपंच

त्याने पापांच्या पायाने
तिचे उष्टावले फूल
उंबर्‍यात अनाथ झाले
भोळ्या तुळशीचे मूळ

धुक्यात हरवले घर
पात्रात अडकली नाव
लाज सावराया आला
उभा आंधळाच गाव

उभा काठावर जीव
येई डोहातुनी हाक
एका ईवल्या डोळ्यांची
हले पापणीही मूक

रडुनिया निजे पाखरु
भ्रमित उत्तरांची मिठी
ती शरिर घेऊनी येता
निघे फकिर भरल्या पोटी

दुःख कोवळे पुरताना
ती सोडुन देते वेणी
का स्पर्श कुणाचे येतील
घेऊन भरली पाऊसगाणी?

1 comment: