Tuesday, 8 November 2011

फिसीकल रात्र

अजाणतेपणी तुझा देह खुडुन
निघुन गेलेल्या फिरस्त्याची
आठवण तुझ्यावर गोंदलेली असते,
’पेन ऑफ दि ख्रिसमस पास्ट’!
करुणाग्रस्त आणि अतृप्त मळवट

उत्कट डोळ्यांनी आतुर
असतात माझी वखवखलेली रंध्र
जमेल तितका प्राशुन घेण्यासाठी
तु़झ्या वेदनेचा फिसीकल फॉर्म

पुरलेल्या सगळ्या वेदना
उकरुन काढल्या तरी
एक रात्र पुरत नाही
गतकाळाचे आंधळे संदर्भ
ओरबाडुन गलबलायला.

तुझ्या माझ्यातली
दोन अजाण समदुःखी मुलं
अनुभुतीच्या असंबद्ध लयीने
ग्रासुन जातात,
या समागमाचे उगम शोधताना.

गुंफलेली कोवळी वीण
तु सहज ओलांडुन जातेस
माझा शापित यक्ष,
मागे ठेऊन ओंजळभर
सावल्यांचे चित्रविचित्र तुकडे

जातं आयुष्य कोंदट होऊन
नि:शब्द शुष्क निश्वासांनी
अशातच दिशाहिन झालेल्या
स्मृतींची लक्तरें विचारतात

अनैतिक करुणा घेऊन उशाशी
त्वचा श्रुंगारुन घरंगळत
हे शरिर जातं रात्रीजवळ
की रात्र येते शरिराजवळ?

1 comment:

  1. फिसीकल रात्र........
    दोन अनोळखी विदिर्ण दुःखी मनं आपापलं शरिर घेऊन एका रात्री एकत्र येतात. एकमेकांच्या दुःखाबद्दल करूणा व्यक्त करण्यापासुन त्यांचा फार्स सुरु होतो. ज्याचा शेवटचा अंक त्यांच्या समागमाने संपतो.त्या दोघांनाहि एकमेकांच दुःख गोंजारायला फक्त शरिर हवं असतं पण त्यांना सखाराम बाईंडर बनता येत नाही. त्यांना आपापली नैतिकताही सांभाळायची असते. मग ते जवळ येण्यासाठी करुणेचा साधन म्हणुन वापर करतात. आवेग ओसरल्यानंतर पडणारे किंवा बहुतकरुन स्वतःच्या हातुन निर्माण झालेले प्रश्न शेवटच्या कडव्यात आले आहेत. सहजपणे ओलांडण्यासाठीच असली तरिही ति तेवढ्या सहजपणे ओलांडली जात नाही. ती आपली पडछाया मागे ठेऊन जातेच जन्मभरासाठी. 'गुंतणे' ही जी प्रकिया आहे ती पुरेपुर मानवीय कशी आहे. स्वतःसाठी जगणारही माणुस आणि गुंतणाराही माणुसच. माणसाची नैसर्गिक बहुरंगी अभिव्यक्ती या विषयावर ही कविता आहे.

    ReplyDelete