Thursday, 13 October 2011

Calcutta brothel (वेदना क्र. ३२)

Calcutta brothel मधुन
अस्फुट स्वरांचे ढग लहरत येतात..
मी सुन्न पायरीशी बसुन असतो,
फिडल वाजवत..
माझ्या व्रणांना लागलेलं
वीर्य चाटुन घेतात, फिडलच्या लाटा..
भुकीने भारलेल्या
वासनेच्या पायथ्याशी
भातुकलीचा खेळ ऎन रंगात असताना...
दग्ध वेदना जोजवत असतो
मनातला उपाशी priest!
बाहुलीचे सोनेरी केस हुंगुन,
शरीर सांधुन...तो उठतो.
करवादणारया लाकडी पायरयांवरुन
मला स्पर्शुन जातं एक आदिम जनावर...
त्याचे उरले सुरले गरम उच्छ्वास
माझ्या सुरात ठेऊन जातात
काही पेनीज आणि वेदना क्र. ३२...
तेव्हाच ती दारात येते
चिरंतन प्रश्नांचे पदर सावरत.
अंधारातली छद्मी हास्यं
वासनेनी उतु जाणारी रंध्रं
गढुळ सत्वाची स्तोत्रं
हवाली करते शांतपणे
मुक्या स्वप्नांच्या समुद्रात....
तिला न बघताच उमजतं
माझी fertile भुक हिस्सा मागतेय.
ओथंबलेली नाणी माझ्यावर
फेकुन ती म्हणते...
Go son, fetch the bread!
No comments:

Post a Comment