Monday, 27 February 2012

गुडलक कॅफे

मी,
ती,
कॉफी,
सिगरेट्स
आणि
गुडलकच्या
गल्ल्यामागच्या
फोटोतून,
मोनालिसा सारखं
हसणारा पारशीबाबा.
इतकं पुरेसं
नाहीये का?
तंद्रीचे अभंग
श्वास घ्यायला?
स्वत:चा
निरोप घेऊन,
इथेच मी
डोळे मिटतोय

सावलीची कथा

मनाच्या अमर्याद
भिंतींमागे
आपण उभे आहोत.
इथुन पलिकडुनच,
आपण एकमेकांशी
बोलतोय नी
स्पर्श करतोय
एकमेकांना

तू बोलत का नाहीस?
तू आहेस का
पलिकडे?
फक्त तुझी सावली हालतेय.
कधीतरी कोणी येऊन
घेऊन जाणार तुला
पलिकडच्या
क्षितिजाकडे
मग मी असाच
एकटा बडबडत राहीन
तुझ्या सावलीशी..........

व्हर्जीन मुलीचं गाणं - १

ग्रीष्मबंधनाचा देह
त्याला मृत्युची चाहूल
वेड्या जन्माचे कोणते
पडे मनस्वी पाऊल

ढग शोधणारया मुली
उठे दुष्काळात गाव
तुझ्या निजल्या डोळ्यांची
जाते रंगांकडे धाव

लेडी मॅकबेथ

मॅकबेथ
तुझी संदिग्धता सूर देतेय
माझ्या स्वराला.
तुझ्या घराचे वासे
अध आहेत.
तेही नेमाने
ढासळत चाललेत
प्रारब्धाला अंतरल्यासारखे.

लेडी मॅकबेथच्या
काळजात दडलेल्या
एका विशाल पोकळीवर
तू लोंबकळतो आहेस.
आणि
तुझ्या दु:खाशी मी!
टिप टिप गळणार्‍या
वेदनेनं भांबावलीये
माझी संवेदना.

आशेची आंधळी किनार
घेऊन तु धडपडतोयस
माकडीणीच्या पिलागत,
गच्च धरुन,
तुझ्या भूतकाळाला.
आणि तुझे हात?
ते नाहीयेत तिथं
केवळ लेडी मॅकबेथच्या
रक्ताळलेल्या हातांशिवाय......
Sunday, 26 February 2012

जिप्सीज : 1

गात्रधूंद मद लेवून
भयशून्य जिप्सीज
नाचताहेत
खुणावताहेत मला
माझ्या वेदनेसकट

तरी इतक्या सहजी
अथकपणातून मुक्ती
नाहीये
पण नवे पर्याय आहेत

इथे स्बत:च विच्छेदन
करुन
मी मन वेगळं करतो
मग वेदना
आकांक्शा
प्रेम श्रद्धा
कृतार्थता वगैरे

या तुकड्यांकडे
पहातोय मी
तिरहाईत नजरेनं
तेव्हा जाणवतं
आरशात आपल्याला
जसा दिसतो तसा
नसतो आपला चेहरा
भूतकाळाचे भयअश्व
खिंकाळत स्वार होतात
वर्तमानावर
आणि भविष्यात जाणारया
त्यांच्या नालबंद पाऊलवेलीवर
आपण चालतोय
निर्बुद्धपणे
त्या चिरंतन भयाशी
तडजोडी करत

आणि माझ्या
दिशाहीन आयुष्याच्या
वर्तुळाची टोकं
भगव्या क्शितिजाशी
संपत नाहीयेत
मी पिकत चाललोय
या सगळ्या
खरया खोट्या अवयवांसकट

डोळ्यापलिकडले
भास नाकारुन
मी माझं सगळं
जमा करतो आणि
हारीने मांडून ठेवतो
जिप्सी शेकोटीपूढे
आणि नाचतो
गातो
प्रेम करतो
मग जेव्हा त्यांचे
हसरे डोळे
मला स्पर्श करतात
मी पूढे करतो
माझ्या वेदनेचा
रिकामी प्याला

Saturday, 25 February 2012

प्राण

दुरस्थ कंदिलप्रकाशात
चालतोय आपण.
अंधार काजळीचं विश्वरुप
विद्ध करणारया,
प्रकाशकिरणाचं बोट पकडून.

दुतर्फा उभ्या पसरलेल्या,
आरशांच्या भिंतींतुन,
थरारताहेत आपल्या
भयाण, निश्चल
सावल्यांची प्रतिबिंबं.

त्या मानवीय नाहीत.
त्यांना पाय नाहीत.
त्या नीरव शोकावर्तात
कालबद्ध आहेत.

त्यांची काजळी
लावून घेऊ
आपल्या व्रणांना.
त्याने आपण एक होऊ?
निदान आपली प्रारब्धं?

आपण एकमेकांचे कोण?
ते माहित नाही.
तरी इथे नजरेत दिसतोय
तुझ्या अभावांना माझा चेहरा
नी माझ्या अभावांना तुझा.
तुच आहेस माझी पायवाट
म्हणून सांगतो,
या कंदिलापलिकडे आपण
अनादि नसु.
पण कंदिलच आहे आपल्या
ब्रम्हाची सीमा.
मर्यादेच्या काठावरुन
कलंडणारी अमर्यादा!

तसं आपणा दोघांनाही आहे,
त्या पुरातन शापाचं वरदान.
नी आपण समिधा आहोत.
आपण आर्त आहोत.
आणि आपण चालतोय.

Thursday, 23 February 2012

मुक्तीद्वार

भगव्या देहाचे मुक्तीद्वार
पाठीवर घेऊन
तो चढत जातो
पहाडी वाट
जाणिव नेणिवेच्या
अनुभुतीची बीजं
विखरुन देत वाटेवर
जात पंथ
धर्म वर्ण
रंग लिंगांतुन
मुक्त होण्यासाठी
स्वताला निर्विकाराने
भारण्यासाठी

पहाडाच्या टोकावर
तो वाट पहातो
मुक्तीद्वार उघडण्याची
बघ मी समाजमितीच्या
सगळ्या संकल्पना
सोडुन आलोय
आदिम होऊन आलोय

तरी ते उघडत नाही
मग देतो ढकलुन
निमिषार्धात
पहाडाच्या टोकावरुन
गडगडत
धडधडत
ते पायथ्याशी येतं

तितक्यात कुठुनसं
भयशुन्य फुलपाखराचं
अस्तित्व लहरत येतं
आणि त्यामागे
कुतुहलाचे पाय घेऊन
एक लुतभरलं कुत्रं
स्वताचं आत्मभान
द्विधा करणारी
खाज विसरुन
वेड्यासारखं झेप घेतं

तडजोडीचं नेमकेपण
नाकारणारी
अंतप्रेरणेची मुळं
आवेगानं दार उघडतात
नी दोघांना सामावून
घेतात
आणि तिथल्या तिथे
ध्यानस्थ ऋषीच्या
डोळ्यांसारखं
दार शांतपणे मिटतं

तो पाहतो उंचावरनं
स्वानुभुतीच्या
व्युहरचनेतनं
स्वयंभु अभावांची
तिरीप येते
आत्मा शरीर मन
चाचपून घेते

तो खाली उतरतो
शांतपणे
मंदपणे
हसत हसत
श्राप भोगत
सिसिफसत

माणसाळलेला माणूस

माणसाळलेला माणूस
नाक्यावरती उभा असतो.
समाज न्याहाळत,
भूक चघळत
थंडपणे श्वास घेतो.

हातात हात घालुन,
फुलं माळलेली
कपल्स येतात.
एकमेकांना किस करत,
धुंद होत निघुन जातात.
तो कोल्डपणे म्हणतो
"सो कूल"
आणि पडलेलं फूल
खिशात ठेवतो.

तसं सहसा चिंतनमुक्त
जगत नसतं कुणीच
त्यात कधीकधी
संपृक्त शरीरावर
अतृप्त विचारांची
बांडगुळं चढतात,
तेव्हा तो स्वताशीच
खदाखदा हसतो.
'ऐला भारीच' म्हणत
विचारांची पिंक टाकतो
की पिंक त्याला टाकते?
सगळा हिशेब एकच!

मिरवणुकीमागे चालत जातो.
अर्धातास भाषणं ऐकतो.
नंतर स्वत:शीच वैतागून म्हणतो,
'आदिवास्यालाही
आध्यात्मिक फिल करुन देईल,
तोच खरा धर्म!'
मग मनातल्या मनात
थुंकून तो चालु लागतो.
समाजाकडुन समाजाकडे....

तशात संध्याकाळ होते.
ढगाळून येतं.
भुकेल्या पोटाला
शहाणं मन काहिसं
गोंजारुन घेतं.
तो निर्विकारपणे
त्यांच्यात मिसळतो.
सगळी गर्दी अंगावर घेतो.

भयभीत झुलत्या पुलावरुन,
शुन्य ओढत गर्दी जाते.
जगण्या मरण्याच्या
तथाकथित संदर्भाँकडे.
कुणीच काही बोलत नाही.
तरी काहीच टळत नाही.
शांतपणे जळत रहातात,
रस्त्यावरचे दिवे....

Monday, 6 February 2012

अशांत वारा

'तुमचं जगणं नामंजुर केलंय!'
अशा आशयाचे खलिते येतात.
त्यातली उद्विग्न शाई,
धुमसताना दिसते.
ती तो पिळुन घेतो.
जखमांवरचे मलम म्हणुन.

वेदनेचे काय?
आजची जगुन झाली
तरी उद्याची जगायची असतेच.
त्यामुळे त्याला किंचितही
भिती वाटत नाही दुःस्वप्नांची

पायाखाली माझी माती आहे.
अन छातीमध्ये सुर्य आहे.
मग चिरंतन वाटेवरचे अनेक हात,
सोबतीला येतील प्रकाशाकडे.

चालता चालता रात्र होते
हाडांना आरपार चिरणारी
कडाक्याची थंडी...
तो झोपतो.
फुटपाथवर
गटाराच्या कडेला
स्ट्रीटलाईटखाली.

तेव्हा ते माग काढत येतात.
संगिनीच्या टोकावर डकवलेलं,
उदारमतवादी घोंगडं
त्याच्याकडे सरकवतात.
त्याच्या हजारो छिद्रातुन,
अंधुकसा प्रकाश गळत असतो.
'हा भुमिगताला पुरणार नाही!'
तो शांतपणे उद्गारतो.

मग पुन्हा खलिते येतात.
नामंजुरीचेच.
त्यावर कुणाचं तरी रक्त असतं.
बेड्या, वधस्तंभ असतात.
पाहुन, लहान मुलासारखं
तो कोवळं हसतो.
आणि उत्तर लिहायला बसतो.
'प्रस्थापितांनो,
ह्र्दयात जोवर निखारे आहेत
आणि आहेत अशांत वारे
तेथपर्यंत खोल रुतत-रुजत राह्तील,
क्रुसावरचे खिळे.
भेटुच आपण पुन्हा.
वस्त्यांत
पोलिसचौक्यांत
आणि रस्त्यांवर....
ता.क.: मी तुम्हालाच नामंजुर करतोय.

Friday, 3 February 2012

तुटलेल्या मैत्रीणीस :२

 तुटलेल्या मैत्रीणीस,

आपण एकमेकांवर प्रेम करता करता,
एकेक दरवाजे बंद करत गेलो.
नवे न उघडता.
अंर्तभागात जसे हलतात सूर,
तशाच विस्कळीत होत चालल्यात
आपल्या वेदना.

त्यालाही आता पर्याय नाहीये.
आपल्यात लपलेला एक खाटिक होता.
तुकड्या तुकड्यात जगणारा.
स्पर्शाचं शिवार मावळे पर्यंत,
त्वचा सोलुन ,
आपली शरिरं आंधळी केली त्यानं.

नंतर आपण एकमेकांच्या
प्रेतयात्रेतही सामील झालो.
झिंगलो,
रडलो,
नाचलो....सर्व काही

पण आता तुझा कंटाळा येतोय.
ओलाव्याची माती गळुन पडतेय,
फुलांसकट
चिरंतन तेवणारया डोळ्यांना,
सारखं वाटतंय की काहीतरी
भयंकर चाल करुन येणार आहे.
पण जिव्हारी लागलेला काळोख
मला हलवुन हलवुन जागं करतो
आणि माझेच शब्द माझ्याकडे पाहुन
खदाखदा हसत सुटतात.
दबक्या आवाजात बजावत रहातात
'तु माणुस म्हणुन जगतोयस
आणि माणुस म्हणुनच उरणार आहेस.'

म्हणुन आता उचल त्या ओळी,
आणि भिरकावुन दे माझी कविता.
त्याबदल्यात,
मी तुला तुझं जगणं परत करतो.
तुझ्या काजळभरल्या डोळ्यांसकट.
मग आपण एकमेकांकडे पाठ करु
आणि खोल अंधारात निघुन जाऊ.
आधीच आपण भिन्न होतो.
आता आपण शुन्य होऊ.

मग अशाच कुठल्यातरी,
एखाद्या रानाच्या अंर्तभागात
भयाण दुःखासारखं ,
निपचित पहुडलेलं तळं असेल
त्यात थेंब थेंब शुन्यपणे,
गळत असेल काळसर निळाई,
नक्षत्रफुलांच्या सावलीवर.
निमुट एकटी होडी असेल,
डुचमळत हेलकावे खात
चंद्राच्या निर्विकार देहासह,
तरंग उठतील,
नक्षत्र थरारेल,
आणि हलकेच त्या निळाईत
विरुन जातील, मंदपणे.
शेवटच्या श्वासाची
माझी वैराण स्पंदने......
                       - हरवलेल्या जहाजाचा कप्तान