Thursday 23 February 2012

माणसाळलेला माणूस

माणसाळलेला माणूस
नाक्यावरती उभा असतो.
समाज न्याहाळत,
भूक चघळत
थंडपणे श्वास घेतो.

हातात हात घालुन,
फुलं माळलेली
कपल्स येतात.
एकमेकांना किस करत,
धुंद होत निघुन जातात.
तो कोल्डपणे म्हणतो
"सो कूल"
आणि पडलेलं फूल
खिशात ठेवतो.

तसं सहसा चिंतनमुक्त
जगत नसतं कुणीच
त्यात कधीकधी
संपृक्त शरीरावर
अतृप्त विचारांची
बांडगुळं चढतात,
तेव्हा तो स्वताशीच
खदाखदा हसतो.
'ऐला भारीच' म्हणत
विचारांची पिंक टाकतो
की पिंक त्याला टाकते?
सगळा हिशेब एकच!

मिरवणुकीमागे चालत जातो.
अर्धातास भाषणं ऐकतो.
नंतर स्वत:शीच वैतागून म्हणतो,
'आदिवास्यालाही
आध्यात्मिक फिल करुन देईल,
तोच खरा धर्म!'
मग मनातल्या मनात
थुंकून तो चालु लागतो.
समाजाकडुन समाजाकडे....

तशात संध्याकाळ होते.
ढगाळून येतं.
भुकेल्या पोटाला
शहाणं मन काहिसं
गोंजारुन घेतं.
तो निर्विकारपणे
त्यांच्यात मिसळतो.
सगळी गर्दी अंगावर घेतो.

भयभीत झुलत्या पुलावरुन,
शुन्य ओढत गर्दी जाते.
जगण्या मरण्याच्या
तथाकथित संदर्भाँकडे.
कुणीच काही बोलत नाही.
तरी काहीच टळत नाही.
शांतपणे जळत रहातात,
रस्त्यावरचे दिवे....

No comments:

Post a Comment