Monday, 6 February 2012

अशांत वारा

'तुमचं जगणं नामंजुर केलंय!'
अशा आशयाचे खलिते येतात.
त्यातली उद्विग्न शाई,
धुमसताना दिसते.
ती तो पिळुन घेतो.
जखमांवरचे मलम म्हणुन.

वेदनेचे काय?
आजची जगुन झाली
तरी उद्याची जगायची असतेच.
त्यामुळे त्याला किंचितही
भिती वाटत नाही दुःस्वप्नांची

पायाखाली माझी माती आहे.
अन छातीमध्ये सुर्य आहे.
मग चिरंतन वाटेवरचे अनेक हात,
सोबतीला येतील प्रकाशाकडे.

चालता चालता रात्र होते
हाडांना आरपार चिरणारी
कडाक्याची थंडी...
तो झोपतो.
फुटपाथवर
गटाराच्या कडेला
स्ट्रीटलाईटखाली.

तेव्हा ते माग काढत येतात.
संगिनीच्या टोकावर डकवलेलं,
उदारमतवादी घोंगडं
त्याच्याकडे सरकवतात.
त्याच्या हजारो छिद्रातुन,
अंधुकसा प्रकाश गळत असतो.
'हा भुमिगताला पुरणार नाही!'
तो शांतपणे उद्गारतो.

मग पुन्हा खलिते येतात.
नामंजुरीचेच.
त्यावर कुणाचं तरी रक्त असतं.
बेड्या, वधस्तंभ असतात.
पाहुन, लहान मुलासारखं
तो कोवळं हसतो.
आणि उत्तर लिहायला बसतो.
'प्रस्थापितांनो,
ह्र्दयात जोवर निखारे आहेत
आणि आहेत अशांत वारे
तेथपर्यंत खोल रुतत-रुजत राह्तील,
क्रुसावरचे खिळे.
भेटुच आपण पुन्हा.
वस्त्यांत
पोलिसचौक्यांत
आणि रस्त्यांवर....
ता.क.: मी तुम्हालाच नामंजुर करतोय.

2 comments:

  1. नारायण सुर्वे,पुश्कीन, येवतुशेन्को आदींचा प्रभाव

    ReplyDelete