Sunday, 26 February 2012

जिप्सीज : 1

गात्रधूंद मद लेवून
भयशून्य जिप्सीज
नाचताहेत
खुणावताहेत मला
माझ्या वेदनेसकट

तरी इतक्या सहजी
अथकपणातून मुक्ती
नाहीये
पण नवे पर्याय आहेत

इथे स्बत:च विच्छेदन
करुन
मी मन वेगळं करतो
मग वेदना
आकांक्शा
प्रेम श्रद्धा
कृतार्थता वगैरे

या तुकड्यांकडे
पहातोय मी
तिरहाईत नजरेनं
तेव्हा जाणवतं
आरशात आपल्याला
जसा दिसतो तसा
नसतो आपला चेहरा
भूतकाळाचे भयअश्व
खिंकाळत स्वार होतात
वर्तमानावर
आणि भविष्यात जाणारया
त्यांच्या नालबंद पाऊलवेलीवर
आपण चालतोय
निर्बुद्धपणे
त्या चिरंतन भयाशी
तडजोडी करत

आणि माझ्या
दिशाहीन आयुष्याच्या
वर्तुळाची टोकं
भगव्या क्शितिजाशी
संपत नाहीयेत
मी पिकत चाललोय
या सगळ्या
खरया खोट्या अवयवांसकट

डोळ्यापलिकडले
भास नाकारुन
मी माझं सगळं
जमा करतो आणि
हारीने मांडून ठेवतो
जिप्सी शेकोटीपूढे
आणि नाचतो
गातो
प्रेम करतो
मग जेव्हा त्यांचे
हसरे डोळे
मला स्पर्श करतात
मी पूढे करतो
माझ्या वेदनेचा
रिकामी प्याला

No comments:

Post a Comment