Thursday, 23 February 2012

मुक्तीद्वार

भगव्या देहाचे मुक्तीद्वार
पाठीवर घेऊन
तो चढत जातो
पहाडी वाट
जाणिव नेणिवेच्या
अनुभुतीची बीजं
विखरुन देत वाटेवर
जात पंथ
धर्म वर्ण
रंग लिंगांतुन
मुक्त होण्यासाठी
स्वताला निर्विकाराने
भारण्यासाठी

पहाडाच्या टोकावर
तो वाट पहातो
मुक्तीद्वार उघडण्याची
बघ मी समाजमितीच्या
सगळ्या संकल्पना
सोडुन आलोय
आदिम होऊन आलोय

तरी ते उघडत नाही
मग देतो ढकलुन
निमिषार्धात
पहाडाच्या टोकावरुन
गडगडत
धडधडत
ते पायथ्याशी येतं

तितक्यात कुठुनसं
भयशुन्य फुलपाखराचं
अस्तित्व लहरत येतं
आणि त्यामागे
कुतुहलाचे पाय घेऊन
एक लुतभरलं कुत्रं
स्वताचं आत्मभान
द्विधा करणारी
खाज विसरुन
वेड्यासारखं झेप घेतं

तडजोडीचं नेमकेपण
नाकारणारी
अंतप्रेरणेची मुळं
आवेगानं दार उघडतात
नी दोघांना सामावून
घेतात
आणि तिथल्या तिथे
ध्यानस्थ ऋषीच्या
डोळ्यांसारखं
दार शांतपणे मिटतं

तो पाहतो उंचावरनं
स्वानुभुतीच्या
व्युहरचनेतनं
स्वयंभु अभावांची
तिरीप येते
आत्मा शरीर मन
चाचपून घेते

तो खाली उतरतो
शांतपणे
मंदपणे
हसत हसत
श्राप भोगत
सिसिफसत

2 comments:

  1. तो पाहतो उंचावरनं
    स्वानुभुतीच्या
    व्युहरचनेतनं
    स्वयंभु अभावांची
    तिरीप येते
    आत्मा शरीर मन
    चाचपून घेते

    अंगावर शहारा आला... ! अनुभूतीच आहे ही कविता म्हणजे...

    ReplyDelete