Saturday, 25 February 2012

प्राण

दुरस्थ कंदिलप्रकाशात
चालतोय आपण.
अंधार काजळीचं विश्वरुप
विद्ध करणारया,
प्रकाशकिरणाचं बोट पकडून.

दुतर्फा उभ्या पसरलेल्या,
आरशांच्या भिंतींतुन,
थरारताहेत आपल्या
भयाण, निश्चल
सावल्यांची प्रतिबिंबं.

त्या मानवीय नाहीत.
त्यांना पाय नाहीत.
त्या नीरव शोकावर्तात
कालबद्ध आहेत.

त्यांची काजळी
लावून घेऊ
आपल्या व्रणांना.
त्याने आपण एक होऊ?
निदान आपली प्रारब्धं?

आपण एकमेकांचे कोण?
ते माहित नाही.
तरी इथे नजरेत दिसतोय
तुझ्या अभावांना माझा चेहरा
नी माझ्या अभावांना तुझा.
तुच आहेस माझी पायवाट
म्हणून सांगतो,
या कंदिलापलिकडे आपण
अनादि नसु.
पण कंदिलच आहे आपल्या
ब्रम्हाची सीमा.
मर्यादेच्या काठावरुन
कलंडणारी अमर्यादा!

तसं आपणा दोघांनाही आहे,
त्या पुरातन शापाचं वरदान.
नी आपण समिधा आहोत.
आपण आर्त आहोत.
आणि आपण चालतोय.

No comments:

Post a Comment