Sunday, 15 January 2012

ते सर्व

बांधावरती उभे रहातात  एकमेकांना खेटुन
ते सर्व!
त्यांचं त्यांनाच कळत नाही
हळुहळु ते स्वतःच होऊन जातात बांध.
मनातला किंवा  मनाबाहेरचा अंधार
थोपवत रहातात, उद्याच्या आशेने
पण एकमेकांना खेटुन,डोळे गच्च मिटुन
आणि लाटेकडे पाठ फिरवुन
प्रश्न सुटत नसतात.
मग अंधारपोकळीचं अवकाश होतं.
शरिरं भरडतात,
मनं उध्वस्त होतात.
रक्त, हिंसा आणि आरोळ्यानी
सारं काही भरलेलं असताना,
अन्यायी राजा नी शुर प्रजा
गोष्टीमधुन फक्त हसतात.

दंगलीत मेलेल्या कुणाचं तरी शव
असंच पडुन रहातं मार्गात.
कोल्हेकुत्रांच्या भयासकट
नगर ध्वस्त होत रहातात.
त्या सर्वांसकट नी जिवंत प्रेतांशिवाय!
मग ते सारे जमतात सुद्न्यपणे
काही झालंच नाही अशा मनाने.
वाळवी उखडुन टाकली जाते,
अंधार लिहीला जातो,
मिटवला जातो
प्रश्नांसकट
व्रणांसकट
पण नुसतं लिहुन अंधार संपतच नाही
अंधार संपण्यासाठी नसतोच मुळी
बांध मात्र तुटण्यासाठी बनवले जातायत
शतकानुशतकें.....




2 comments:

  1. मग ते सारे जमतात सुद्न्यपणे
    काही झालंच नाही अशा मनाने.
    वाळवी उखडुन टाकली जाते,
    अंधार लिहीला जातो,
    मिटवला जातो
    प्रश्नांसकट
    व्रणांसकट

    प्रश्न,,, व्रण.... सारं सारं जसंच्या तसं ..... फक्त अंधार साचतो त्यावर....!!!
    आवडली कविता ...
    नुसती आवडली नाही... घुसली.... भिडली ..... टोचली...!

    ReplyDelete
  2. धन्यवाद चैताली.

    ReplyDelete