Thursday, 15 March 2012

रख्स-ए-बिस्मिल

या शहरात,
इंद्रियांची भूमिका
विस्तारते क्षणोक्षणी.
देह शिणत नाही.
पण, जीव शिणतो नेमाने.

इथेही आहेत
वारुळांचे चक्रव्युह,
सनातन वेदनांचे
अमानुष पर्याय,
गिधाडं-प्रेतांच्या
बेगुमान वस्त्या,
सावलीला दिवस
आणि
करुणेला रात्र.

इथे
काळोखाच्या ओठांतून,
बर्फाळ प्रार्थनाही
वाहत जातात,
अवरोधाच्या उगमाकडे.
भळाभळा अस्तित्व सांडत
गर्दी जगत रहाते,
होकार नकारांमध्ये
अडकलेल्या
ऐतिहासिक आवृत्त्या...


इथल्या किंकाळीतच,
नग्न आत्म्याचा देह
वस्रांसकट जन्म घेतो.
भयमग्न आवेगात
देह नग्न होतो.
आत्मा वस्र घेतो...

या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
आणि मी असतो,
काळोख जगणारया शरीरात,
भूकेच्या टोलांवर,
जीवाला झोके देत.
सर्वांसह, स्वतःच्या
खुनाचे निर्विकार
कट रचत.

मनातल्या मनात मात्र,
पलिकडचे डोळे
खुणावून सांगतात,
'हे संदर्भ मिटले जावेत.
ही नियती पुसली जावी.
मौनाची रौद्र गाज
रक्तातून कानी यावी.
पैलु पाडलेल्या मुठींना
शुळांचे कोंभ फुटावे.
बंद देहाच्या अवयवांनी
दार मोकळे करावे.
माझाही व्हावा सर्वनाश
माझ्याशिवाय.'

तेव्हा शुभ्र शांततेच्या
एकांतात खुंट तोडुन,
बेहोष वेदनेत मी
सुगंध नाचवत नेईन,
क्षितिजाच्या पारावर
जिवंत होईल,
रख्स-ए-बिस्मिल!

No comments:

Post a Comment