Saturday 16 March 2013

Something-'Genesis'-Something

बेडवर उद्ध्वस्त होताना
त्याने,
तिला दिली
आपण उद्ध्वस्त झाल्याची
प्रांजळ कबुली.

ती म्हणाली,
हा प्रांजळपणा
मुखवटा आहे.
हद्दपार होताना,
मागे राहीलेले ठसे
घेऊन परत ये
आणि भेट मला
वास्तवाच्या
काळ्या विवरापलिकडे.
मी तुला घेऊन उभी आहे.

------------------------------------******-------------------------------------------------------------------

तो ऎकतो,
असण्या नसण्याच्या
सगळ्या ठाम पर्यांयांमधलं
हो, हो
मध्येच कुठेतरी
बांधलेल्या वारुळांतुन
नेमकेपणाचे गगनभेदी शंख.

तो बघतो,
सभोवताली,
सगळ्या मर्त्य-अमर्त्य
जाणिवांच्या चक्रव्युहातुन
सर्वत्र सरसरत जाणारी
वेदना,
त्याच्या हाडामासातुन
प्रवास करत
पेशीपेशींच्या स्वयंभू अस्तित्वापर्यंत.

तसा तो सहसा
बाहेर काहीच बोलत नाही.
पण एकांतात
आपले भास क्रुसावर लटकवुन
जोजवत रहातो स्वत:ला
केवळ एक
निरिच्छ विरंगुळा म्हणुन.
तसा त्याच्या वर्तमानातला
प्रत्येक क्षण
निमित्त असतो
त्याच्या असण्याचा.

त्याला जाणवतं नक्कीच की,
प्रत्येक क्षणी
की तो पाहतोय,
ऐकतोय,
बोलतोय,
तो तयार होतोय
येणार्‍या पुढच्या क्षणांत
पहाण्यासाठी
बोलण्यासाठी
ऐकण्यासाठी
आणि असण्यासाठी.

------------------------------------*****-------------------------------------------------------------
स्वयंभू भासांनी
उजळणारं शरीर घेऊन
नेणीव खणत जाताना
स्वत: खणला जातो तो
पुरलेल्या
सेल्फ पोट्रेट्च्या कॅनव्हासकट.
अस्ताला.

No comments:

Post a Comment