Sunday 4 August 2013

शीप ऑफ थिसीयसः पॅराडॉक्सचं मोहोळ


हया चित्रपटावर एक चित्रपट म्हणून खूप काहीं लिहिलं गेलंय. पण हा लेख मुख्यत: या चित्रपटाची तत्वज्ञानविषयक बाजू पडताळण्याचा केलेला प्रयत्न आहे. ही चित्रपटाची समीक्षा नाही. *या लेखात चित्रपटाच्या कथेविषयी रहस्यभेद आहेत.*
प्लुटार्कने मांडलेला थिसीयसचा पॅराडॉक्स : जर जहाजाच्या जुन्या फळ्या एकेक करुन बदलल्या गेल्या तर नवीन फळ्यांनी बनलेलं जहाज हे तेच मूळ जहाज असेल की नाही?
थॉमस हॉब्सने मांडलेली पॅराडॉक्सची पुढची बाजू : जर जहाजाच्या बदलल्या गेलेल्या सगळ्या जुन्या फळ्या एकत्र करुन त्यांचं पुन्हा अगदी तसेच्या तसे(qualitatively identical) जहाज बांधलं तर या नव्या जहाजाला शिप ऑफ थिसीयस म्हणायचं कां?
      थोड्क्यात शिप ऑफ थिसियसला केवळ भौतिक अस्तित्व आहे कि त्याला मेटाफिसीकल बांधणीही आहे? शिप ऑफ थिसियसच्या जागी एक सजीव माणूस ठेवला तर? आपण केवळ एक अणूरेणूंची काँप्लेक्स केमिस्ट्री आहोत की त्यापलिकडे अजून कांही? असे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात.

१)अंध छायाचित्रकार (नेणीवेची जाणीव)


आलिया ही एक अंध छायाचित्रकार. ही छायाचित्र टिपण्यासाठी ध्वनीचा वापर करते. नंतर ते आपल्या बॉयफ्रेंडकडून समजून घेते. मुख्य भाग असा की, ती त्याच्याकडून केवळ समजून घेते, पण त्याला निवडू देत नाही. त्याने तिच्या निवडीवर घेतलेला एक छोटासा आक्षेपही तिला पटत नाही आणि त्यासाठी ती अगदी टोकाला जाऊन त्याचे समर्थन करते. दुसर्‍या एका प्रसंगात, आलियाने काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनात तिची मुलाखत घेताना, आलिया सस्किंन्द्च्या 'पर्फ्युम' या कादंबरीचा उल्लेख करते. या कादंबरीचा नायक त्याच्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा गंध मनात साठवून ठेवतो. एका तथाकथित साचेबद्ध सौंदर्याच्या संकल्पनेच्या पलिकडे जाऊन वेगळ्याच आणि नवीन जाणीवांमध्ये सौंदर्य शोधणारा नायक आलियाचं स्फुर्तीस्थान आहे.
      ही पहिली कथा आयुष्य,कला आणि सौंदर्य यांच्याबाबत काही महत्वाचे प्रश्न आपल्यासमोर उभी करते. एखाद्या गोष्टीला अनुसरुन आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा तो पुरेपूर आपलाच विचार नसतो. त्यावर आपला मूळ स्वभाव,आचारविचार, जडण-घडण, संस्कृती या सगळ्यांनी निर्माण केलेला एक विशिष्ठ ठराविक साचा असतो. आपण ती मांडणी सहसा भेदत नाही, पण आलियाकडून ती भेदली जाते. आलिया जन्माने आंधळी नाही त्यामुळे एका डोळस माणसाच्या साच्यात ती वाढलीये. तिने काय गमावलंय याची तिला कल्पना असली तरी ती त्यावर मार्ग शोधते. ती जाणिवेच्या आकलनासाठी केवळ ध्वनीच्या माध्यमाचा वापर करते आणि आधी अनेकदा नेणीवेत ढकललेल्या नव्या सौंदर्यविश्वात प्रवेश करते.म्हणून तिला आपण अंधत्वामुळे कुठेही लिमिट झालो आहोत असे वाटत नाही.यातून अनेक प्रश्न उभे रहातात, ते म्हणजे आपल्या आयुष्याच्या आपण ठरवलेल्या सगळ्या संकल्पना आपल्या अंगभूत नैसर्गिक जाणिवांना झाकोळून टाकतात का? is there a hidden beauty in isolation of our senses? आपण व्याख्या आणि थिअरीजमध्ये जगतो का?
     आलियाचं अंधत्व आणि नंतर अंधत्वातून डोळसपणाकडे होणारं संक्रमण हे खूप ताकदीने दाखवलं गेलंय. आधी सहज फेरफट्का मारताना, रिक्षातून प्रवास करताना केवळ ध्वनीचा माग घेत ती रोजच्या सामान्य जीवनशैलीतलं सौदर्य टिपून घेते, परंतु डोळे आल्यावर तिला ते isolation of senses जमत नाही. आलियाला दृष्टी मिळाली तरी तिची सौंदर्य टिपणारी नजर नष्ट होते. आधी कुठेही सौंदर्य शोधणार्‍या आलियाला एखाद्या प्रेरणात्मक स्पॉटवर जाऊन फोटो काढावेसे वाटतात, त्यातही तिला आधीसारखे फोटोज काढणं जमत नाही आणि त्याच प्रयत्नात ती पुढे हिमालयही गाठते. तीलाही याची जाणीव आहे, ते विषद करताना ती म्हणते,"A frog once asked a centipede how is it to walk on a hundred feet so gracefully synchronized while the frog finds difficult to manage even two. A centipede took a moment to analyse its walk and was baffled. So as it tried to walk further its feet got entangles and it tripped." या कथेचा शेवटचा प्रसंग म्हणजे चेरी ऑन द केक टाईप रुपक आहे. नदीवरच्या पुलावर आलिया बसलेली असताना ती आपल्या कॅमेरावर कॅप (अंधत्व) लावायला जाते, पण चुकून ती हातून निसटते आणि नदीच्या पात्रात कायमची नाहिशी होते.  इथे पहाताना आपल्याला जाणवतं की जेव्हा आपण आपल्या आयुष्याबद्दल आणि अस्तित्वाबद्दल जसजसा जास्त खोल विचार करत जातो आणि संकल्पना मांडत जातो, तसतसं आपल्याभोवतीचं आपलंच अजाणतेपण नष्ट व्हायला लागतं. आपली मानसिक शांती भंग पावते आणि कितीही केलं तरी आपण पुन्हा आपल्या जाणीवांना नेणीवांचं रुप देऊ शकत नाही. नव्या प्रश्नांचा सामना करत आपल्याला जगावंच लागतं. ("Ignorance is like a delicate fruit; touch it, and the bloom is gone." - Oscar Wilde) इथे अजाणती आणि नंतर जाणती झालेली व्यक्ती हाडामांसाने एकच आहे, परंतु ती खरोखर एकच आहे का??? हा खरोखरीचा बदल आहे की केवळ बदलाची संकल्पना?
(to be continued.....)
   

1 comment: