एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भितीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन क्न्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भितीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.
आपली जसजशी प्रगती होत चाललीये तसतसं माहीतीचं आदान प्रदान करणं अधिक सोप्पं होत चाललंय. आपल्या पडणारे प्रश्न यांची उत्तरे जगाच्या एका दुसर्या कोपर्यात शोधता येतात. या वाढत्या ज्ञानाच्या कक्षांमूळे खरतर धर्म आणि अतिजुन्या सत्वहीन धार्मिक कल्पना यांभोवती दाटलेलं अज्ञानाचं धूकं दूर होणं अपेक्षित होतं पण तस नक्की होतंय का? आपण चिकित्सा करायलाच तयार नाही आहोत यामूळे धर्म अधिकाधिक रिजिड आणि वास्तवापासून दूर चाललेला दिसतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक वर्तनाची मानके बनवणे हे जास्त जनतेचे आणि पर्यायाचे समाजाचे काम आहे. (भारतीय संविधान, मुलभूत कर्तव्ये, ARTICLE 51A [h]to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform) आता निदान या क्षणापासून तरी विवेकवादी विचारसरणीची कास धरण्याची खूप गरज निर्माण झाली आहे. काही ठराविक लोक, संस्था, आंधळे विचार आपल्या भोवतालचं वास्तव वेगाने बदलता आहेत आणि आपण सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने आपल्याला ते सहज जाणवत नाही, मग अचानक दाभोळकरांसारख्या समाजसेवकाचा खून पडल्यावर आपल्या जाणीव होते पण तिथपर्यंत खुप उशीर झालेला असतो. असा उशीर होऊ नये, यासाठी 'सत्यशोधन' हा लहानपणापासून आपल्या शिक्षणाचा भाग होणे आवश्यक आहे, हे मुल्य जोपासण्यासाठी त्याला पुरेश्या लिबरल मानसिकतेच्या पाठिंब्याचीही गरज आहे. सत्यनारायण, नवस-सायास, देवाचे दुधाने, तेलाने अभिषेक, अर्थाची चिकित्सा न करता आरत्या, मंत्र म्हणणं, विविध बापू महाराजांच्या भजनी लागणं, सगळेच करतात म्हणून एखादी निर्बुद्धपणे करत रहाणं, इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल असंवेदनशीलता, इतर जातींवर धर्मांवर चिखलफेक करणं, प्रत्यक्ष किंवा गुपचूप एकाच जातीधर्माच्या लोकांमध्ये मिसळून गट करुन रहाणं या गोष्टींचा उल्लेख करण्याचे कारण असे की या गोष्टी खूप बेसिक आहेत. घरात, शाळा-कॉलेजात आणि लोकॅलिटीमध्ये यांचं प्रत्यक्ष किंवा सुप्त शिक्षण आपोआप मिळत असतं, त्यासाठी विशेष मेहनत किंवा अभ्यास करावा लागत नाही. काही ठराविक व्यक्ती तर या मुर्खपणाचे मोफत क्लासेस चालवत असतात. कसल्याही चिकित्सेशिवाय शरण जाण्याची मानसिकता तयार करुन जोपासण्यास इथुन सुरुवात होते आणि काहींसाठी हा प्रवास आसारामबापू-निर्मलबाबा यांच्या मठात नाहीतर धार्मिक-जातीय दंगलीपर्यंत अविरत सुरु रहातो. म्हणूनच अशा कुठल्याही कार्यकारणभावाला थारा न देणार्या, प्रतिगामी आणि नुकसानकारक धार्मिक संकल्पना यांसाठी आपला वेळोवेळी कच्चा माल म्हणून वापर होऊ नये यासाठी लहानपणापासूनच विवेकवादावर आधारलेल्या समाजशिक्षणाची तत्काळ गरज निर्माण झालीये.