तुटलेल्या मैत्रीणीस,
आपण एकमेकांवर प्रेम करता करता,
एकेक दरवाजे बंद करत गेलो.
नवे न उघडता.
अंर्तभागात जसे हलतात सूर,
तशाच विस्कळीत होत चालल्यात
आपल्या वेदना.
त्यालाही आता पर्याय नाहीये.
आपल्यात लपलेला एक खाटिक होता.
तुकड्या तुकड्यात जगणारा.
स्पर्शाचं शिवार मावळे पर्यंत,
त्वचा सोलुन ,
आपली शरिरं आंधळी केली त्यानं.
नंतर आपण एकमेकांच्या
प्रेतयात्रेतही सामील झालो.
झिंगलो,
रडलो,
नाचलो....सर्व काही
पण आता तुझा कंटाळा येतोय.
ओलाव्याची माती गळुन पडतेय,
फुलांसकट
चिरंतन तेवणारया डोळ्यांना,
सारखं वाटतंय की काहीतरी
भयंकर चाल करुन येणार आहे.
पण जिव्हारी लागलेला काळोख
मला हलवुन हलवुन जागं करतो
आणि माझेच शब्द माझ्याकडे पाहुन
खदाखदा हसत सुटतात.
दबक्या आवाजात बजावत रहातात
'तु माणुस म्हणुन जगतोयस
आणि माणुस म्हणुनच उरणार आहेस.'
म्हणुन आता उचल त्या ओळी,
आणि भिरकावुन दे माझी कविता.
त्याबदल्यात,
मी तुला तुझं जगणं परत करतो.
तुझ्या काजळभरल्या डोळ्यांसकट.
मग आपण एकमेकांकडे पाठ करु
आणि खोल अंधारात निघुन जाऊ.
आधीच आपण भिन्न होतो.
आता आपण शुन्य होऊ.
मग अशाच कुठल्यातरी,
एखाद्या रानाच्या अंर्तभागात
भयाण दुःखासारखं ,
निपचित पहुडलेलं तळं असेल
त्यात थेंब थेंब शुन्यपणे,
गळत असेल काळसर निळाई,
नक्षत्रफुलांच्या सावलीवर.
निमुट एकटी होडी असेल,
डुचमळत हेलकावे खात
चंद्राच्या निर्विकार देहासह,
तरंग उठतील,
नक्षत्र थरारेल,
आणि हलकेच त्या निळाईत
विरुन जातील, मंदपणे.
शेवटच्या श्वासाची
माझी वैराण स्पंदने......
- हरवलेल्या जहाजाचा कप्तान